नवी दिल्ली : जून महिन्यात ओढ देणारा मान्सून हा आता संपूर्ण देशभरात सक्रिय झाला आहे. तसेच देशातील अनेक राज्यांत सध्या मुसधार पाऊस कोसळत असून, हवामान खात्याने १७ राज्यांमध्ये वादळी वार्यांसह मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा दिला आहे. तसेच महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
मुंबईसह महाराष्ट्राला झोडपून काढल्यानंतर आता पावसाने आपला मोर्चा दिल्ली आणि एनसीआरकडे वळवला आहे. आज सकाळपासून दिल्ली, नोएडा आणि गुरुग्राममध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठलं आहे. तसेच सकाळी शाळेत जाणारे विद्यार्थी आणि कामावर जाणार्या कर्मचार्यांना याचा सर्वाधिक फटका बसला.
गुजरातमधील सूरत, बडोद्यात पूरस्थिती
गुजरातमधील सूरत आणि बडोदा या शहरांमध्ये मुसळधार पावसानंतर पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी पाणी साठल्याने पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला आहे. दरम्यान, पावसामुळे ८ जुलै रोजी अनेक ट्रेन रद्द कराव्या लागल्या, तर काही ट्रेनचा मार्ग बदलावा लागला, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. दरम्यान, गुजरातमधील सूरत येथे मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी बुधवारी शहरातील वेगवेगळ्या भागातून काही मृतदेह ताब्यात घेतले आहेत.
हिमाचलमध्ये ढगफुटी
हिमाचल प्रदेशमधील कुलू जिल्ह्यातील गडसा खोर्यात ढगफुटी होऊन अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. पाण्याच्या वेगवान प्रवाहामध्ये एक छोटं पूल वाहून गेलं आहे. त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच प्रशासनाकडून मदत आणि बचाव काम सुरू करण्यात आलं आहे.
वायनाडमधील भूस्खलनातील मृतांची संख्या पाचवर
केरळमधील वायनाड जिल्ह्यातील कल्लाडी-अनाक्कमपोयिल बोगद्याच्या बांधकाम स्थळी झालेल्या भूस्खलनामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा वाढला असून, या दुर्घटनेतील मृतांची संख्या पाचवर पोहोचली आहे. वायनाडमध्ये भूस्खलन झाल्यानंतर १८ जण ढिगार्याखाली अडकले होते. त्यापैकी ९ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. तर ढिगार्याखाली अडकलेल्या चार जणांचा शोध सुरू आहे.